तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालय बाहेर होतेय गर्दी ! जमीन, पैसा यासाठी इतरांच्या जीवाशी होतोय खेळ

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात दररोज शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य आहे कि नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. माञ प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना अनेक ठिकाणी शहरातून येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाची बाधा होऊन काहींचा मृत्यू देखील झालेला आहे, सदर घटना टाळण्यासाठी शासनाने अनेक नियम लागू करून पाच पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घातली असून गर्दी करण्यावर देखील बंदी घातली आहे. मात्र शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात पुणे, मुंबई सह अनेक ठिकाणाहून तसेच प्रतिबंधक क्षेत्रातून जमीन खरेदी, विक्री, करारनामे करण्यासाठी येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे, त्यामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याची काळजी नसून जमीन, पैसा यामध्ये त्यांचे जीवन असल्याचे दिसून येत आहे.

मात्र तळेगाव ढमढेरे सह परिसरात शेकडो नागरिक कोरोना बाधित झालेले असून काही नागरिकांचा मृत्यू देखील झालेला असताना प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत तळेगाव ढमढेरेचे तलाठी ज्ञानदेव बराटे यांनी सांगितले की तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय समोर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणून त्याबाबत उपाययोजना करण्याबाबतचे लेखी पत्र यापूर्वी दुय्यम निबंधक कार्यालयला दिलेले आहे, माञ त्यांचे त्याकडे लक्ष नाही.

तर शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी सांगितले की तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय समोर वारंवार मोठी गर्दी होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सदर कार्यालयात जाऊन त्यांना गर्दी होऊ न देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबत तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे दुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र फुलपगारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आमच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना टोकन पद्धतीने नंबर लावण्यास सांगून त्यांना त्यांची निच्छित वेळ देऊन त्याच्या कामाच्या वेळेत बोलावयाची व्यवस्था करत गर्दी कमी केली जाईल.

माञ पैसा,जमीन, संपत्तीच्या हवासापोटी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबणार केव्हा अशा सवाल नागरिक उपस्थित करत आहे, त्यामुळे संबधित कार्यालयातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.