उदयनराजे भाजपाच्या गळाला लागणार का?

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ खासदार उदयनराजे हे एकाच गाडीतून गेले़ त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले हे कोणाला भीत नाहीत, तर ते सर्वांना खिशात घेऊन फिरतात असे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितल्याने राजे  भाजपाच्या गळाला लागणार का या चर्चेला साताऱ्यात एकच उधाण आले आहे.

महाबळेश्वर सातारा धामणेर रस्ता भूमिपूजन कार्यक्रमाआधी चंद्रकांत पाटील आणि खा.उदयनराजे एकाच गाडीत गेल्यामुळे ते भाजपाप्रवेश कधी करणार याची दिवसभर चर्चा साताऱ्यात होत राहिली. विशेष म्हणजे, उदयनराजे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती, तेव्हापासूनच ते भाजपामध्ये जाणार अशी चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.  याच पार्श्वभूमीवर, चंद्रकांत पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची शासकीय विश्रामगृह सातारा येथे सकाळी भेट घेवून चर्चा केली.

गेल्या काही दिवसांपासून सातारा लोकसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या अंतर्गत आमदार गटांमध्ये व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात विरोधाचे वातावरण सुरू आहे. त्यातच उदयनराजे यांची भाजपा नेत्यांशी होत असलेली जवळीक यामुळे उदयनराजे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वतुर्ळात सुरू आहेत. खा. उदयनराजेंची लोकसभा उमेदवारी नक्की कोणत्या पक्षातून यावरुन माध्यमांबरोबरच सोशल मिडियात रोजच नवनवे संदेश येणे सुरु आहे. आज साताऱ्यात आलेल्या महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाडीत कराड पासून सातारापर्यंत खा. उदयनराजेंनी प्रवास केल्यामुळे पुन्हा एकदा खा. उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत.