ग्रामविकासच्या निर्णयाकडे राज्यभरामधील शिक्षकांचं ‘लक्ष’, ‘चॉईस पोस्टींग’साठी शरद पवारांना साकडे

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत असताना राज्य सरकारने ३१ जुलै पूर्वी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणून राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी सोयीच्या बदल्यांसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे साकडं घातलं आहे. त्याच पार्श्वभूमीवरती कोल्हापुरात आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची बैठक होत आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या या निर्णयाकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

यासंदर्भांत शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी माहिती दिली. राज्य शासनाने जिल्हा परिषदांना प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ३१ जुलै पूर्वी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. २७ फेब्रुवारी १७ च्या जुन्या सरकारी निर्णयानुसार या बदल्या होत आहेत. जुन्या सरकारी निर्णयामुळे यंदाच्या वर्षी विस्थापित, रँडम राऊंड, समानीकरण, आंतर जिल्हा बदलीने आलेले शिक्षक, पती पत्नी यांच्यापैकी कोणत्याही शिक्षकांना विशेष लाभ मिळत नसल्याच्या कारणावरुन शिक्षकांत नाराजी पसरली आहे.

यापूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात झालेल्या प्राथमिक शिक्षक संघ महामंडळाच्या सभेत शरद पवार यांच्या उपस्थितीत बदली धोरणात दुरुस्ती करुन सोयीच्या बदल्या करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संघटनांची भूमिका समजून घेण्याची अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली होती. तथापि, अभ्यासगटाचा अहवाल येण्यापूर्वीच राज्य सरकारने ३१ जुलै पूर्वी बदल्या करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे शिक्षक नेते संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी शरद पवारांकडे सोयीच्या बदली धोरणासाठी आग्रह धरला आहे.