‘टीम इंडिया’च्या फलंदाजांची पुन्हा ‘हाराकिरी’

ख्राइस्टचर्च : वृत्तसंस्था – पहिल्या कसोटीतून काहीही बोध न घेणार्‍या टीम इंडियाचा प्रमुख फलंदाजांनी आज दुसर्‍या कसोटीत पुन्हा एकदा खराब फटके मारुन हाराकिरी केली. ६३ षटकात भारताचा सर्व डाव २४३ धावात तंबूत परतला.

कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा टीम साऊदीचा शिकार बनला. कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम साऊदीने नोंदविला आहे. साऊदीने आतापर्यंत कोहलीला १० वेळा बाद केले आहे.

गेल्या कसोटीत अपयशी ठरलेला पृथ्वी शॉ याने या वेळी शानदार फलंदाजी करत चांगली सुरुवात केली. मयंक अग्रवाल मात्र केवळ ७ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि पृथ्वी शॉ यांनी ५० धावांची भागीदारी करुन भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अर्धशतकानंतर पृथ्वी शॉ परतला. त्यानंतर आलेल्या कोहली मात्र प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. तो केवळ ३ धावा करुन टीम साऊदीचा शिकार बनला. अजिंक्य रहाणेही आज खेळपट्टीवर टिकला नाही.

पुजारा आणि हनुमाना विहारी यांनी ८१ धावांची भागीदारी ही सर्वात मोठी ठरली. मात्र, अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा याचा संयम सुटला व तो एक खराब फटका मारताना झेलबाद झाला. त्यानंतर चहापानाच्या शेवटच्या चेंडुवर विहारीही बाद झाला. त्यानंतरच्या फलंदाजांनी केवळ खेळपट्टीवर हजेरी लावली.

ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, उमेश यादव, मोहमद शमी हे एका पाठोपाठ तंबूत परतले आणि केवळ ६३ षटकात २४२ धावा करु शकले. शेवटचे ५ बळी केवळ ४८ धावात गळाले. दोन कसोटीच्या मालिकेत न्यूझीलंडने पहिली कसोटी जिंकून १ -० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीतील डाव पुढे खेळत असल्यासारखी भारतीय फलंदाजांची खेळी दिसून येत होती.