तेजस्वी यादव यांच्याबाबत शरद पवारांचं खूप मोठं विधान, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बिहार विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्र होणार असून, आताची आकडेवारी पाहता भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. दरम्यान, बिहार निवडणुकीवरती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “बिहार निवडणुकीत एका बाजूस पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपाचे सर्व नेते प्रचार करत होते. दुसरीकडे अनुभव नसलेला तरुण नेता निवडणूक लढत होता. तेजस्वी यादव यांना जितक्या जागा मिळतील ते त्यांचे ‘यश’ म्हणावे लागेल. तेजस्वी यादव यांच्या यशामुळे तरुणांना प्रेरणा मिळेल आणि इतरांनाही मार्ग दिसेल,” अशा शब्दांत त्यांनी तेजस्वी यादव यांचे कौतुक केलं आहे.

बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काही जागा लढवल्या होत्या. मात्र, तेजस्वी यांना मदत होण्यासाठी आम्ही या निवडणुकीकडे दुर्लक्ष केलं, असे पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये भाजपाच्या जागा वाढल्याचा दावा करण्यात येत आहे, याबाबत वार्ताहरांनी विचारले असता, आमच्या डोक्यात ही गोष्ट आली नव्हती ती आणून दिल्याबाबत धन्यवाद, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच बिहार निवडणुकीचा तामिळनाडूमध्ये परिणाम होईल, असे वाटत नाही आणि पश्चिम बंगालमध्ये काय होईल हे बघावे लागेल, असे सुद्धा त्यांनी सांगितलं.

अर्णब प्रकरणावरुन राज्यपालांना टोला

राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्या काळजीपोटी आणि सुरक्षेपोटी फोन केला ही चांगली गोष्ट आहे. मात्र, ज्या कुटूंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे त्यांच्याबाबतही थोडी सहानभूती त्यांनी दाखवली असती तर बरे झालं असते, असा टोला शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला.