महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांचे अनुकरण तेलंगणा सरकार करेल : कृषी मंत्री निरंजन रेड्डी

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – तेलंगणा राज्यामधील सर्वच १५ साखर कारखाने खाजगी आहेत. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने पाहण्यासारखेआहेत. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांचे तेलंगणा सरकार निश्चित अनुकरण करणार असल्याचे मत तेलंगणा राज्याचे कृषिमंत्री निरंजन रेड्डी यांनी व्यक्त केले.

तेलंगणा राज्याचे कृषिमंत्री के. निरंजन रेड्डी गेले दोन दिवस बारामती दौऱ्यावर असून काल त्यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन नुकतीच सोमेश्वरनगर ( ता. बारामती) येथील
सोमेश्वर सह. साखर कारखान्याला भेट देऊन सहकाराची माहिती घेतली. यावेळी सोमेश्वरचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, व्हाईस चेअरमन शैलेंद्र रासकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांच्यासह कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि तेलंगणा शेती अभ्यासक उपस्थित होते.

रेड्डी पुढे म्हणाले, तेलंगणात उसाची बिलाची शाश्वता नाही. बहुतांश कारखाने एफआरपी देखील पूर्ण करत नाहीत. आणि उसाला दर मिळत नसल्याने उसाच्या पिकाकडून शेतकरी इतर पिकाकडे वळत आहेत. त्यामुळे तेलंगणा कृषी मंत्रालयाचा मानस आहे की महाराष्ट्रासारखे तेलंगणात सहकारी साखर कारखाने सुरू करून शेतकऱ्यांना अधिकचे चार पैसे कसे मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी सोमेश्वर कारखान्याचा कारभार कसा चालतो याची माहिती घेतली. अकाउंट विभाग, कामगार किती, सभासद किती, ऊसदर किती दिला, कामगार बोनस, साखर कशी तयार होते, सहवीजप्रकल्प, डिस्टलरी या सगळ्यांची माहिती घेतली. तसेच जानेवारी महिन्यात तेलंगणाच्या शंभर शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी सोमेश्वर कारखान्यावर घेऊन येणार असल्याचे कृषीमंत्री रेड्डी यांनी सांगितले.