बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणी १७ वर्षा नंतर साक्षीदाराची साक्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येथील विशेष मोक्का न्यायाधिश एस. एच. ग्वालानी यांच्या समोर 19 वर्षा पूर्वीच्या बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणी आज शेख सिराजऊल रेहमान (लातुर) यांची सीबीआय ने मे. 2003 रोजी नोंदविलेल्या जबाबाची आज विशेष न्यायालयात सरकार पक्षाने 17 वर्षा नंतर साक्ष नोंदविली.

शेख यांनी आज न्यायालयात शपथेवर साक्ष देताना अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. शेख म्हणाले, “मी गाव सोडून मुंबईत कामाच्या शोधात 1996 मध्ये आलो. भाजपाचे तत्कालीन आमदार भगवानराव नागरगोजे यांच्या कुलाबा येथील मॅजिस्टीक या आमदार निवास मधील त्यांच्या रूम मध्ये वास्तव्यास होतो. त्या दरम्यान अब्दुल करीम लाडसाब तेलगी याची ओळख झाली. तेलगी म्हणाला माझे मंत्रालयात स्टॅम्प व्हेनडींगचे लायसेन्स काढण्याचे काम आहे करू शकतोस का ? तेव्हा माझ्या ओळखीचे पत्रकार हरिष पाठक यांना स्टॅम्प लायसेन्स मिळू शकते का ? असे विचारले. तेव्हा पाठक यांनी लायसन्स मिळेल पण 15 ते 20 हजार रुपये खर्च येऊ शकतो. तेलगीने रुपये 20 हजार दिले व तत्कालीन मुद्रांक अधिक्षक राधेश्याम मोपेलवार यांचे कडे अर्ज दाखल करण्यास सांगितले.

अर्ज दाखल केल्यानंतर सर्व कागदपत्रांची पुर्तता केली व पाठक यांनी तत्कालीन कायदा मंत्री लिलाधर डाके यांच्या कडे नेले. तेव्हा ते म्हणाले हे खाते नारायण राणे यांच्या कडे आहे त्यांच्या कडे जा. त्यानंतर मी, पाठक व माधव राणेंना भेटलो. राणेंनी त्यांचे पीए रवी शेडगे यांना यांचे काम करून टाकण्यास सांगितले. तेलगीने रू 15000/- पाठक ला दिले व लायसेन्स मिळाले. दरम्यान तेलगीचा पुतण्याला मुंबईत अटक झाली व माधव यांचे लायसेन्स सरेंडर करावे लागले तेलगीने सेटींग लाऊन पुतण्याला सोडविले.

त्यानंतर 1999 ला आघाडी सरकार आले. तेलगी मला म्हणाला तुझ्या गावचे लातुरचे मुख्यमंत्री झालेत पुन्हा लायसेन्स काढू तुला फायदा करून देतो. माझा मित्र नरेश राठोड माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या कडे घेऊन गेला. त्यावेळी अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते. चव्हाण यांचे पीए राजेश जिवाणी यांच्या कडून लायसेन्स चे काम करून घेतले.

ज्या ज्या वेळी मी तेलगीला त्यांच्या कार्यालयात भेटायचो त्या त्या आमदार अनिल गोटे, अनिल शहा, शर्मा, सावंत हे लोक असायचे असे शेख यांनी साक्षीत सांगितले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. विद्याधर खोसे, अ‍ॅड. मिलींद पवार, अ‍ॅड. श्रुषी घोरपडे व अ‍ॅड श्रेयेस कुलकर्णी यांनी साक्षीदाराची उलट तपासणी घेतली. पुढील सुनावणी 29 जुन 2019 रोजी होणार आहे.