शिवाजी विद्यापीठातील ‘या’ प्राध्यापकांना उत्सुकता; मुदतवाढ की थेट पाच वर्षांची नियुक्ती ?

कोल्हापूर  : पोलीसनामा ऑनलाइन –   कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामधील कंत्राटी सहायक प्राध्यापकांची मुदत ७ डिसेंबरला संपुष्टात येणार आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के त्यांना मुदतवाढ देणार की, थेट पाच वर्षांसाठी नियुक्ती देणार?, असा प्रश्‍न आता अनेकांना पडत आहे. त्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये होईल का?, याचीदेखील उत्सुकता लागली आहे. तसेच सीएचबी प्राध्यापक नियुक्तीच्या मागणीला ते पूर्णविराम देतील का?, अशीदेखील विचारणा होत आहे.

कोरोना विषाणूच्या थैमानामुळे कंत्राटी प्राध्यापक हवालदिल झाले आहेत. प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना त्यांची नेमकी स्थिती लक्षात आलीय. त्यांनी प्राध्यापकांना तीन महिने मुदतवाढ देऊन दिलासा दिलाय. ही मुदतवाढ ७ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. या शिवाजी विद्यापीठातील अधिविभागांमधील कामकाज कोण सांभाळणार?, असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. शिवाजी विद्यापीठातील नियमित २१० पैकी सुमारे ८४ प्राध्यापक कार्यरत आहेत. कंत्राटी प्राध्यापकांना कामाचा अनुभव असल्याने ते परीक्षेसह अन्य कामांची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना केवळ अकरा महिन्यांसाठी सेवेत घेतले जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. कंत्राटीपैकी तेरा प्राध्यापक सीईबीसी प्रवर्गातले आहेत.

मराठा समाज आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे त्यांची धाकधूक वाढलीय. आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत नोकरभरती होणार नाही, हे आता स्पष्ट झालंय. त्यात महिन्याकाठी एखादा प्राध्यापक निवृत्त होत असल्याचे चित्र आहे. ही स्थिती लक्षात घेत कंत्राटी प्राध्यापकांना पाच वर्षांसाठी नियुक्ती दिली, तर ते विभागात झोकून देऊन काम करतील, असा अंदाज शैक्षणिक क्षेत्रातील काही लोक व्यक्त करत आहेत.

याचबरोबर, त्यांना संशोधनाच्या कामातदेखील लक्ष घालता येईल. त्यामुळे कुलगुरू डॉ. शिर्के त्यादृष्टीने पावले टाकतील का?, हाच मुद्दा आहे. पाच वर्षांची नियुक्ती करताना ती नियमित पोस्ट नसणार, हे आता उघड आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये सीएचबी तत्त्वावर प्राध्यापक नियुक्ती नको, असे जाणकारांना वाटत आहे. त्याचा विचार करता कंत्राटी प्राध्यापकांची पाच वर्षांसाठी नियुक्ती व्हावी, अशी प्राध्यापकांची अपेक्षा आहे.

शिवाजी विद्यापीठ दृष्टिक्षेप :

एकूण नियमित प्राध्यापक- २१० (२०१२ ची स्थिती), नियमित प्राध्यापक- ८४ (२०२० ची स्थिती)
कंत्राटी सहायक प्राध्यापक- ७८ असे आढळून येत आहे.

You might also like