ठाकरे मंत्रिमंडळात फक्त 2 दिवसात बदल, ‘या’ 2 मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 15 दिवसांनी मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना खातेवाटप केले. सहा मंत्र्यांकडे 54 खात्यांची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडे महसूल राष्ट्रवादीकडे जलसंपदा तर शिवसेनेकडे गृह आणि नगरविकास ही महत्त्वाची खाती आली आहेत. मात्र, अवघ्या 48 तासातच मंत्रिमंडळातील खातेवाटपात काही बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्या खात्यांची अदलाबदल करण्यात आली आहे.

खाते वाटपामध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या गृह खाते देण्यात आले असले तरी विस्तारानंतर हे खाते राष्ट्रवादीला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे कोणतेही खाते ठेवलेले नसले तरी कोणत्याही मंत्र्याकडे न देण्यात आलेली खाती उद्धव ठाकरेंकडे आहेत. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या झालेल्या चर्चेनंतर खाते वाटपावर सहमती झाली. त्यानुसार छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांच्याकडे काही खात्यांचा पदभार देण्यात आला होता, त्यामध्ये बदल करण्यात आला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्याला मंजुरी दिली आहे.

छगन भुजबळांकडील खाती – ग्रामविकास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन

जयंत पाटील – वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्यांक विकास

खाते वाटपातील बदल
जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते जयंत पाटील यांच्याकडे तर अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्यांक विकास आणि कल्याण हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे. हा एकमेव बदल खातेवाटपात करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/