मुंबई रेडी रेकनर दरात घट तर राज्यात पुण्यात सर्वाधिक वाढ !

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारकडून दर वर्षी एक एप्रिल रोजी रेडीरेकरनचे दर अर्थात वार्षिक बाजार मूल्य नव्याने जाहीर केले जाते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भावामुळे रेडीरेकरनचे दर जाहीर करण्यात आले नव्हते. आता राज्य सरकारने रेडीरेकरनच्या दरात सरासरी वाढ केली आहे. रेडी रेकरनरचे दर वाढवताना राज्यातील ठाकरे सरकारने आपल्यासोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. राज्याचे रेडी रेकरनरचे दर निश्चित करताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच मुंबईत रेडी रेकरनच्या दरात 0.6 टक्क्यांनी घट केली. तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे 3.91 टक्के वाढ केली.

मुद्रांक शुल्क विभागाने जून महिन्यातच शासनाला प्रस्ताव सादर केला होता. परंतु मुंबईच्या दर निश्चितीसाठी तब्बल दोन महिने राज्याचे रेडी रेकनर दर लांबवणीवर पडले. राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार असून, त्यांचे अनेक चांगले-वाईट गोष्टी समोर येत आहेत. याचाच एक भाग म्हणजे राज्याचे रेडी रेकरनचे दर निश्चित करताना मोठी गडबड करण्यात आली आहे. आघाडी सरकारमधील तीन पक्ष आप-आपले गड कसे मजबूत होतील याकडे लक्ष देत अधिक फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे करत असताना ते एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचे दिसत आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. याचा परिणाम सर्वच उद्योगधंद्यावर झाला आहे. जास्त करुन बांधकाम व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यात बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे गेली दोन वर्षे रेडी रेकरन दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. त्यातच यावर्षी नैसर्गिक संकट आणि महामारिचे संकट यामुळे रेडी रेकनरच्या दरात नियमानुसार वाढ करण्यात आली आहे. केवळ हा नैसर्गिक नियम लावताना मुंबईसाठी वेगळा आणि पुण्यासाठी वेगळा नियम लावण्यात आला आहे.

राज्यातील रेडी रेकनरचे दर

राज्य सरकारने रेडी रेकरनच्या दरात सरासरी वाढ केली आहे. 1.74 टक्के अशी ही वाढ करण्यात आली आहे.ग्रामीण भागात 2.81 टक्के, प्रभाव क्षेत्रात 1.89 टक्के, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात 1.29 टक्के वाढ आणि महापालिका क्षेत्रात 1.2 टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक वाढ पुणे जिल्ह्यात झाली आहे. जी 3.91 टक्के इतकी आहे. तर पिंपरी-चिंचवड क्षेत्रात ही वाढ 3.2 टक्के पुणे महापालिका क्षेत्रात ही वाढ 2 टक्के आहे. मुंबई उणे 6 टक्के, ठाण्यात 0.44 टक्के, नाशिक 0.74 टक्के, नागपूर 0.1 टक्के, नवी मुंबई 0.99 टक्के रायगड 3 टक्के अशी वाढ करण्यात आली आहे. कोरोना काळात महसुलात 60 टक्के घट झाली आहे तर दस्त नोंदणीत 40 टक्के घट झाली आहे.

पुण्यावर दुहेरी अन्याय, मुंबईच डबल फायदा

राज्य शासनाने मंदी आणि कोरोना संकट या पार्श्वभूमीवर स्टँप ड्युटीमध्ये 3 टक्क्यांची सवलत दिली आहे. शासनाने स्टॅम्प ड्युटीवर सवलत दिल्यानंतर घर खरेदी विक्री व्यवहारामध्ये चांगली वाढ झाली आहे. मात्र, आता रेडी रेकनर दरामध्ये केवळ पुणे जिल्ह्यात 3.91 टक्के वाढ करण्यात आल्याने पुण्यातील घरांच्या किंमती पुन्हा वाढणार आहेत. रेडी रेकनरचे दर स्टॅम्प ड्युटीच्या सवलती पेक्षा अधिक असल्याने पुण्यावर दुहेरी अन्याय झाला आहे. तर मुंबईकरांना स्टॅम्प ड्युटीवरील सवलत आणि रेडी रेकनर दरात घट असा डबल फायदा झाला आहे.