चुकीच्या बिलासाठी ३५,००० रुपये भरपाई देण्याचा ग्राहक संरक्षण न्यायालयाचा ‘आदेश’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाणे जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण न्यायालयाने वीज वितरण कंपनीला ग्राहकांना चुकीचे बिल पाठविल्याबद्दल ३५ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. २०१४ सालच्या या प्रकरणात कोर्टाने सांगितले की, कंपनीच्या सेवेतील कमतरतेमुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासाची योग्य नुकसान भरपाई दिली जावी.

एसडी मडाके यांच्या अध्यक्षतेखालील ग्राहक तक्रार निवारण मंचाने सात ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार कामंटघर, भिवंडी येथील रहिवासी राजेंद्र जैन यांच्या फ्लॅटची तोडलेली वीज पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देखील टॉरंट पॉवर लिमिटेडला दिले.

दुसरा फ्लॅट भाड्याने देण्यास भाग पाडले :
यासंदर्भात कंपनीने १९ एप्रिल २००८ रोजी कंपनीने चुकीचे बिल दिल्याची जैन यांची तक्रार मान्य केली आणि मीटरचा नंबर तक्रारकर्ता यांच्याशी संबंधित नसल्याचे आणि हे बिल चुकून आल्याचे सांगितले. मात्र यावर जैन यांनी कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्यानंतर भाडेतत्त्वावर दुसरा फ्लॅट घेण्यास भाग पडल्याचे सांगितले. वीज कंपनीने हे आरोप फेटाळून लावत तीन लाख तीस हजार रुपयांच्या भरपाईच्या अर्जाला विरोध दर्शविला.

वीज तोडण्यापूर्वी नोटीस बजावावी :
ग्राहक कोर्टाने म्हटले आहे की वीज खंडित करण्यापूर्वी ग्राहकाला नोटीस बजावणे ही प्रतिवादीची जबाबदारी आहे. प्रतिवादीने केवळ असे सांगितले की ही वीज कायदेशीररित्या कापली गेली आहे, परंतु वीज तोडण्यापूर्वी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन केले गेले आहे का याचा उल्लेख मात्र केला नाही किंवा अधिकृत नोटीस बजावली नाही. कोर्टाने टोरंट पॉवर कंपनी लिमिटेडला २५ हजार रुपये भरपाई आणि १० हजार रुपये दंड यासह ग्राहकांना ३५ हजार रुपये देण्याचे निर्देश दिले.

Visit : Policenama.com