Coronavirus : मुंबईच्या चाकरनाम्यांमुळे रत्नागिरी हादरली, 22 नवे ‘कोरोना’ रुग्ण आढळले

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – मंगळवारचा एक दिवस शांत झालेल्या रत्नागिरीला बुधवारी (दि.13) मोठा धक्का बसला. बुधवारी रात्री उशीरा मिळालेल्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे 22 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 74 झाली आहे. या नव्या 22 रुग्णांमधील बहुतेक रुग्ण हे मुंबईहून रत्नागिरीत आले असल्याची माहिती उपलब्ध आहे. बुधवारी 24 अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 22 अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रत्नागिरीत एकाच दिवशी कोरोनाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण पहिल्यांदाच आढळले आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यातील 11, दापोली 4, रत्नागिरीतील 7 रुग्णांचा समावेश आहे. रत्नागिरीत सापडलेल्या 7 पॉझिटिव्ह पैकी 4 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. मंडणगडमधील 11 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 7 पुरुष व 4 महिला आहेत. तर दापोलीत सापडलेले चारही पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष आहेत. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 74 झाली आहे. यातील बहुतांश रुग्ण मुंबईतून गावी आलेले असल्याने प्रशासन हादरलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाणे या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत असून त्यातून कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने व जिल्हातील रुग्णसंख्या अचानक वाढल्याने जिल्हा प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आधीच या स्थितीवर चिंता व्यक्त केलेली आहे. रत्नागिरीत बाहेरून मोठ्या संख्येने लोक येत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, असे मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.