‘शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याबद्दल आभार’, पंकजा मुंडेंनी अर्जून खोतकरांच्या विधानावर दिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री अर्जुन खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना बुधवारी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. या ऑफर बद्दल पंकजा मुंडे यांनी अर्जुन खोतकर यांचे आभार मानले आहेत. औरंगाबादहून बीडकडे जाताना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे वडीगोद्री गावात वार्ताहरांशी संवाद साधला.

त्या प्रसंगी बोलताना मुंडे म्हणाल्या की, “अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेने दिलेल्या ऑफर बद्दल त्यांचे मी आभार मानते. माध्यमातून याबाबत मी ऐकले होते. ओबीसी समाजाची माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. लोकांच्या अपेक्षा, पीडित वंचितांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात आले. शेवटपर्यंत राहणार. तद्वतच, नाथाभाऊ राष्ट्रवादीत गेले याचा मला धक्का बसला. नाथाभाऊ पक्ष सोडून जाणार नाहीत, असे मी सतत बोलले होते. याची वेदना, खंत व खेद वाटतो,” अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. खडसे यांनी बुधवारी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात त्यांनी अधिकृत प्रवेश केला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

त्यानंतर बोलताना खडसे म्हणाले की, मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपमध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. ४० वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटत नाही. विधानसभा निवडणुकीतही मानहानी आणि छळ करण्यात आला. मी यासंदर्भात वरिष्ठांना सभागृहात पुरावे देण्याची विंनती केली, मात्र, आजवर प्रश्नच उत्तर मिळाले नाही, असा दावा खडसे यांनी व्यक्त केला.