जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गजाआड

कोतवाली (अहमदनगर) : पोलीसनामा ऑनलाईन- प्रवाशांना लुटणाऱ्या फरार सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी सापळा रचून अटक केली. मुदसर मन्सुर पठाण असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आसून त्याने आपल्या साथिदारांच्या मदतीने सिंधु भगवान तांदळे (वय-५०) या महिलेला लुटले होते.हा प्रकार २६ जून २०१८ रोजी अरणागांव दौंड रोडवर घडला होता. आरोपीला माळीवाडा बस स्टँड परिसरात बुधवारी (दि.१६) रात्री अटक करण्यात आली.

तांदळे यांना पुणे येथे जायचे असल्याने त्या अहमदनगर बस स्टँडवर थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपीने त्यांना पुणे येथे सोडतो असे सांगून गाडीत बसवले. आरोपींनी तांदळे यांना आरणागांव दौंड रोडने नेऊन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोकड बळजबरी करुन चोरुन नेले. घटनेनंतर आरोपी मुदसर पठाण फरार झाला होता. आरोपी मुदसर पठाण हा माळीवाडा बस स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नागवे, पोलीस कॉस्टेबल पालवे, पोलीस नाईक शहिद शेख, पठाण, म्हस्के, गाडगे, दुधाळ, इंगळे, लहारे, शेख, मोहिते यांच्या पथकाने केली.