भेटी-गाठी सुरू, पण डॉ. विखे अजून ‘गॅस’वर !

खा. गांधींसाठी देशभरातील जैन समाज एकवटला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षात प्रवेश करून डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेची उमेदवारी गृहीत धरून भेटीगाठींवर भर दिला आहे. मात्र विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्यासाठी देशभरातील जैन समाज एकवटला आहे. अल्पसंख्यांक जैन समाजाच्या राज्यातील एकमेव खासदाराला तिकीट नाकारू नये, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे डॉ. विखे हे अजूनही ‘गॅस’वरच आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करणारे डॉ. सुजय विखे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक दिवस ‘गॅस’वर ठेवले. शेवटपर्यंत ही जागा काँग्रेसला सोडण्याबाबत अनिश्चितता होती. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला जागा देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर लोकसभेच्या उमेदवारीचे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या डॉ. सुजय विखे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षात प्रवेश केल्यानंतर आपली उमेदवारी निश्चित आहे, असे चित्र तयार झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही  डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी देण्याची शिफारस केंद्रीय समितीकडे केली आहे, असे जाहीरपणे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी डॉ. विखेंना उमेदवारीचा शब्द दिला असला, तरी खा. दिलीप गांधी यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, असे सूचक वक्तव्य केले होते. खा. दिलीप गांधी हे अल्पसंख्यांक जैन समाजाचे आहेत. जैन समाजाचा महाराष्ट्रात एकमेव खासदार असून त्यांची उमेदवारी नाकारू नये, यासाठी देशभरातील जैन समाज एकवटला आहे. जैन समाजाकडून भाजपाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांवर दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे खा. गांधी हे अजूनही आशावादी आहेत. डॉ. सुजय विखे यांना अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.  त्यामुळे भाजपात प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे हे अजूनही ‘गॅस’वर आहेत.