हाथरस प्रकरणातील आरोपींना त्वरित फाशी दया, शहर शिवसेना महिला आघाडीने केली मागणी

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन  –   उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील एका दलित युवतीवर चार नराधमांनी अत्याचार करुन केलेल्या हत्येने संपूर्ण देश हादरला असून या घटनेतील आरोपींना त्वरीत फाशी देण्यात यावी अशी मागणी भद्रावती तालुका शिवसेना महिला आघाडी आणि युवा सेनेतर्फे येथील तहसीलदारांना एक निवेदन सादर करुन करण्यात आली.

उत्तरप्रदेशातील कायदा व सुव्यवस्था कमालीची बिघडली असून या राज्यात महिला सुरक्षित राहिल्या नाही. असाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. हाथरस जिल्हातील युवतीसोबत कूकर्म करून तिचा निर्घृनपणे खून करण्यात आला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून या घटनेतील नराधम आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा द्यावी व अशा गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदा निर्माण करावा अशी मागणी करणारे निवेदन भद्रावती शिवसेना महिला आघाडीतर्फे दि. 5 ऑक्टोम्बर ला तहसीलदार तथा ठणेदारांना देण्यात आले.

या घटनेत योगी शासनसुद्धा दोषी असून हे सरकार आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत संपूर्ण घटना दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. या घटनेतील पीडित युवतीच्या कुटूंबियांना संरक्षण देऊन पिडीतेला न्याय द्यावा अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष माया नारळे ,उपाध्यक्ष शिला आगलावे, तालुका अध्यक्ष संगीता डाहूले , रजनी डंभारे ,युवासेनेचे जिल्हा समन्वय तथा नगर सेवक पप्पू सारवान ,उपजिल्हा संघटक हर्षल शिंदे ,तालुका अध्यक्ष महेश जीवतोडे ,विशाल नारळे सचिन गावंडे ,अनिता चव्हाण ,अल्का वाटकर ,संगीता विजयकर ,चामाटे मॅडम आदी महिला व कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.