बारामतीतील डाबर गॅंगचा म्होरक्या जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती येथील दरोडा व मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपी व डाबर गँगच्या म्होरक्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

राहुल बाबूराव ढावरे (रा.बारामती) असे त्याचे नाव आहे. त्याला सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून अटक करण्यात आली आहे.

ढावरे आणि साथीदारांनी बारामती परिसरात दहशत पसरवली होती. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. ढावरे आणि त्याचे साथीदार किशोर ढोरे, अभिजीत ढोरे, अजय देशमुख यांनी उपहारगृह चालकाला मटण देत नाही म्हणून कोयता उगारून धमकावत गल्ल्यातील पाच हजारांची रोकड लुटली होती. त्याबरोबरच मध्यस्थी करणाऱ्याला मारहाण केली. त्यात तो जखमी झाला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ.संदीप पखाले यांनी विशेष पथक तयार करून तपास करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.

पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. वेशांतर करुन पोलिसांची पथके बारामती, लोणंद, फलटण भागात त्याचा माग काढत होती. तो ढावरे लोणंद भागात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला सापळा लावून पकडले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश क्षीरसागर, सुनिल बांदल, महेश गायकवाड, निलेश कदम, ज्ञानेश्वर क्षीरसागर, सचिन गायकवाड, बाळासाहेब खडके यांनी ही कारवाई केली.