चक्क पोलीस अधिक्षकांच्याच बंगल्यात ‘चोरी’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक शहरात सामान्य नागरिक चोऱ्यांनी हैराण आहेत. एकीकडे नाशिकमधील चोऱ्यांचे सत्र थांबत नसताना आता पोलीस अधिक्षकांचा बंगलाही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांच्या मध्यवस्तीतील बंगल्यातून चोरट्यांनी छोटा मोठा दागिना नव्हे तर चंदनाची झाडेच चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिक शहराच्या मध्यवस्तीत ग्रामीण पोलीस अधिक्षकांचा बंगला आहे. या बंगल्याशेजारी व समोर कडेकोट बंदोबस्त तैनात असतो. मात्र तरीही बंगल्यातून ५ जून रोजी चोरट्यांनी चक्क दहा वर्षांची एक फुट व्यासाची तीन चंदनाची झाडे तोडून अलगद चोरून नेल्याचे समोर आले आहे. तीन दिवस उलटूनही याचा तपास लागला नाही. मात्र अखेर पोलिसांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकऱणी गुन्हा दाखल केला आहे.