2 राज्यात विभागले गेले आहे ‘हे’ रेल्वे स्थानक, निम्मे महाराष्ट्र तर निम्मे गुजरातमध्ये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेचा इतिहास खूप जुना आहे. रेल्वेबद्दल बर्‍याच मनोरंजक गोष्टी आहेत, ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. तुम्हाला माहित आहे का की, देशात एक रेल्वे स्टेशन असेही आहे, जे दोन राज्यात वसले आहे. खरतर पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ मार्गावर नवापूर रेल्वे स्टेशन आहे. जे दोन राज्यात विभागले गेले आहे.

नवापूर रेल्वेस्थानकाचा निम्मा भाग महाराष्ट्रात आणि निम्मा गुजरातमध्ये येतो. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विट करून या रेल्वे स्थानकाची माहिती दिली आहे. रेल्वेमंत्री म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का की देशात असे एक रेल्वे स्टेशन आहे, जे दोन राज्यात वसलेले आहे ? सुरत-भुसावळ मार्गावरील नवापूर हे एक असे स्टेशन आहे, जिथे दोन राज्यांच्या सीमारेषा स्थानकांच्या मधोमध आहेत.

त्यामुळे या स्थानकाचा निम्मा भाग गुजरातमध्ये आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात आहे. जेव्हा नवापूर स्टेशन बांधले गेले होते तेव्हा महाराष्ट्र व गुजरातचे विभाजन झाले नव्हते. त्यावेळी नवापूर स्टेशन संयुक्त मुंबई प्रांताच्या अखत्यारीत होते. जेव्हा मुंबई प्रांताचे विभाजन झाले, तेव्हा नवापूर स्टेशन महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांत विभागले गेले. तेव्हापासून या स्थानकाची स्वतःची एक वेगळीच ओळख आहे. दोन राज्यात विभागलेल्या नवापूर रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांना चार वेगवेगळ्या भाषांमध्ये कोणतीही माहिती दिली जाते. घोषणा हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी भाषेत होते, जेणेकरुन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांना ते सहज समजू शकेल.