‘या’ कारणासाठी ऋषिकेश माईणकर याच्या खुन्याला सर्वोच्च न्यायालयाने दाखविली दया

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – सासवड येथील डॉ. अशोक माईणकर यांचा १३ वर्षाचा मुलगा ऋषिकेश याचे खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्यात आला होता. त्याचा खून करणाऱ्या सुरेश बोरकर या गुन्हेगाराने आतापर्यंत १८ वर्षे तुरुंगात काढली आहेत. या काळात त्याने लिहिलेल्या कवितांमुळे त्याला आपली चूक उमगल्याने तो सुधारण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून आल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याला दया दाखविली आहे. त्याची फाशीची शिक्षा रद्द करुन जन्मठेप सुनावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए़. के. सिक्री, न्या. एस. अबुल नझीर व न्या. एम. आर. शहा यांनी हा निकाल दिला आहे.
आपल्याबरोबर कॉम्प्युटर क्लासमध्ये शिकणाऱ्या ऋषिकेश माईणकर याचे खंडणीसाठी अपहरण करुन त्याचा खून करणाऱ्या ज्ञानेश्वर सुरेश बोरकर याला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. पुण्यात तेव्हा हा खून खटला खूप गाजला होता. उच्च न्यायालयाने ऑगस्ट २००५ मध्ये ही शिक्षा कायम केली होती. त्याविरुद्ध बोरकर याने सर्वाेच्च न्यायालयात अपिल केले होते. हा खटला तब्बल १५ वर्षे प्रलंबित होता. सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे याची नुकतीच सुनावणी झाली. न्यायालयाने खूनाबद्दल ज्ञानेश्वर बोरकर याला खालच्या न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. मात्र, त्यांची तुरुंगात असतानाची वागणूक पाहून फाशी रद्द करुन जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.

ज्ञानेश्वर बोरकर याच्या वतीने अ‍ॅड. कॉलिन गोन्साल्विस यांनी युक्तीवाद केला. त्यांनी खूनाबद्दल दोषी ठरविण्याचा निर्णय मान्य केला. तरीही त्याला फाशी देऊ नये, यासाठी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्याने खंडपीठाने निष्कर्ष काढला की ज्ञानेश्वरने गुन्हा केला तेव्हा तो २२-२३ वर्षाचा होता. तो गेली १८ वर्षे तुरुंगात आहे. तुरुंगात त्याची वागणूक चांगली राहिली आहे. तुरुंगात असतानाच तो बी. ए़. झाला. त्याने गांधीवादी विचारांचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. त्याने तुरुंगात ज्या कविता लिहिल्या आहेत. त्यातून त्याला आपली चूक उमगल्याचे व तो सुधारण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. तो सुधारु शकतो व त्याचे पुनर्वसनही होऊ शकते. तो एक चांगला नागरिक म्हणून समाजात पुन्हा वावरु शकतो. तो पुन्हा तसाच गुन्हा करण्याची शक्यता राहिलेली नाही व त्याच्यापासून समाजास धोका राहिलेला नाही. हे त्याच्या सध्याच्या मनोदशेवरुन स्पष्ट दिसते. अशा परिस्थितीत त्याने केलेला गुन्हा कितीही गंभीर असला तरी त्यासाठी त्याला आता फाशी देणे न्यायाचे होणार नाही, असा निष्कष खंडपीठाने काढला व त्याची फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

या घटनेमुळे डॉ. अशोक व डॉ. अश्विनी माईणकर यांचे कुटुंब उद्ववस्त झाले आहे. त्यांना ऋता व ऋषिकेश अशी दोन मुले होती. खून झाला तेव्हा ऋषिकेश १३ वर्षाचा तर ऋता १४ वर्षाची होती. ऋषिकेशबाबत झालेल्या घटनेमुळे ऋता हिला मोठा धक्का बसला. त्या धक्क्यातून ती कधीच सावरु शकली नाही. त्यातूनच तिने २००३ मध्ये आत्महत्या केली. बोरकर याच्या एका कृत्यामुळे डॉक्टरांना मात्र आपली दोन्ही मुले गमाविण्याची पाळी आली.