भाऊ दारू पिऊन घरात घालायचा धिंगाणा, लहानग्यानं दगडाने ठेचून संपवलं

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मोठा भाऊ दारू पिऊन घरात धिंगाणा घातल घरामध्ये भांडण करत असल्याचा राग लहान भावाला आला. मोठा भाऊ दारू पिऊन सतत इतरांना त्रास देत असल्याने लहान भावाला राग अनावर झाला आणि त्याने आपल्या मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

पोलिसांना मृतदेह पेठ रोडवरील नामको कँन्सर हॉस्पिटलच्यासमोर रस्त्यालगत आढळून आला. संतोष सखाराम थोरे (वय-40) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मखमलाबाद भागात राहण्यास होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष थोरे याला दारु पिण्याचे व्यसन होते. तो दारूच्या प्रचंड आहारी गेला होता. तो दारू पिऊन पत्नीला त्रास देत होता तसेच तिला मारहाण करत होता. त्यामुळे संतोषच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. तरी देखील तो दारू पिऊन घरातील इतर लोकांना आणि नातलगांना त्रास देत होता. याचा लहान भावाला प्रचंड राग आला होता.

सोमवारी रात्री संतोष पुन्हा दारू पिऊन घरी आला. दारुच्या नशेत त्याने पुन्हा एकदा घरात धिंगाणा घातला. त्यामुळे संतप्त झालेल्या लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या भावावर हल्ला केला. त्याला बेदम मारहाण केल्यानंतर दगडाने ठेचून त्याचा खून केला. यानंतर मृतदेह पेठ रोडवरील नामको कॅन्सर हॉस्पिटलच्यासमोरील रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा संशयित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.