चोरट्यांचा चौकीदाराच्या पैशांवर डल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जुने धुळे शहरामध्ये एका चौकीदाराला गंडवून त्याच्या पैशांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सुरक्षारक्षक सुनिल पांडुरंग मुंढे यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातील पैसे काढून घेतले. मुंढे यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल मुंढे हे चौकीदारीचे काम करतात. मुंढे यांना अलोक नावाच्या व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधला. अलोक या व्यक्तीने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खाते क्रमांक, एटीएम पिन नंबर विचारला. मुंढे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून बँक खात्याची सगळी माहिती दिली.

अलोक या व्यक्तीने त्यांच्या एटीएम पीनचा उपयोग करून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या जवळील एटीएम मशीन मधून पैसे काढले. आरोपी अलोक याने मुंढे यांच्या बँक खात्यातून ६२ हजार ८०० रुपये परस्पर काढून त्यांची फसवणूक केली. हा प्रकार मुंढे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अलोक या व्यक्ती विरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अलोक याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करून तपास सरू केला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल आर.डि. साळुंखे हे करीत आहेत.