पुणे : २० दिवसांपुर्वी कामावर ठेवलेल्या नोकरांनीच केला हात साफ, १८ लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोणतीही विचारपूस न करता नोकरांना कामावर ठेवणे महागात पडू शकते. पुण्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. २० दिवसांपुर्वी पती-पत्नीला कामावर ठेवले. त्यानंतर घरमालक दाम्पत्य आणि आईवडील बाहेरगावी गेले. परंतु ते परगावी गेल्याचा डाव साधत दोघा नोकरांनीच त्यांच्या घरातील १८ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या ऐवजावर डल्ला मारल्याचा प्रकार कर्वे नगरमधील नवसह्याद्री सोसायटीमध्ये उघडकिस आला आहे. याप्रकरणी दोघांवरही अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगत आणि त्याची पत्नी गीता (दोघांचेही नाव पत्ता पुर्ण माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आशिष अशोक शहा (वय. ४४, शुभंकरी बंगला, कर्वे नगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष शहा हे व्यावसायिक आहेत. ते कर्वे नगर येथील नवसह्याद्री सोसायटीमध्ये असलेल्या शुभंकरी बंगल्यात कुटुंबियांसह राहतात. २० दिवसांपुर्वी त्यांनी जगत आणि गीता नावाच्या दाम्पत्याला आपल्या घरी घरकाम करण्यासाठी ठेवले. त्यांनी काही दिवस कामही केले. त्यानंतर शहा हे पत्नीसोबत केरळला गेले होते. तर त्यांचे आईवडीलही नातेवाईकांच्या लग्नासाठी अमरावती येथे गेले होते. त्यामुळे घराला कुलुप होते. त्यादरम्यान जगत आणि गीता हे दाम्पत्य त्यांच्याच बंगल्याजवळ राहायला होते. दरम्यान ते परत आले तेव्हा त्यांच्या घराचे मागच्या दाराची कुलुप उचकटलेले होते. त्यानंतर घऱातील कपाटातील दागिने व पैसेही गायब होते. शहा यांनी जगत आणि गीता यांचा शोध घेतला. त्यावेळी दोघेही गायब होते. तर त्यांचा फोनही बंद आहे. घरात पाहिल्यावर त्यांच्या कपाटातील आईचे दागिने व पत्नीचे असे ४८ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे हिरेजडीत दागिने रोख रक्कम असा तब्बाल १८ लाख ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज गायब होते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घोडके करत आहेत.

मागील काही महिन्यांपुर्वी वारजे परिसरातही अशाच प्रकारे नोकरांनी लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला होता. त्यामुळे घरकामासाठी नोकर ठेवताना त्याची पडताळणी करून किंवा त्याची पुर्ण माहिती घेऊनच कामावर ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.