‘…मग मुख्यमंत्र्यांनी Facebook Live सुध्दा इंग्रजीतच करावं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळीच कोरोना संसर्गाच्या जागतिक साथीमुळे २५ मार्च पासून गेले ६९ दिवस घरांच्या दरवाजांच्या आड ‘लॉक’ असलेला देश आता तीन प्रमुख टप्प्यात ‘अनलॉक’ होणार आहे. त्यामुळे केंद्राच्या निर्देशांनुसार आता राज्य सरकारही मार्गदर्शक तत्वे जारी करून अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न करेल. शिवाय राज्यातील लॉकडाऊन कशाप्रकारे असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला लागली असताना, राज्य शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशावरती मनसेने आक्षेप घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ‘पुनश्च हरी ओम’ म्हणत प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश इंग्रजीत प्रकाशित केले आहेत. त्यावरती मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, इंग्रजीला महाराष्ट्राची राजभाषा केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन, शासनाच्या Mission Begain Again या आदेशाच्या शीर्षकाला ‘पुनश्च हरी ओम’ म्हटलं की १२ पानी असलेला आदेशाचा मराठी अनुवाद झाला, असं समजायचं का? मग मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह इंग्रजीतच करावं, असा टोमणा मारला आहे. तसेच राज्यातील लॉकडाऊन ची स्थिती काय असणारा हे जाणून घेण्यासाठी राज्यातील लोक आदेशावरती तुटून पडले आहेत. पण आदेश संपूर्णपणे इंग्रजीतच आहे.

राज्यामधील सामान्य लोकांना मराठी भाषा कळते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही का ? लॉकडाऊन बाबत लोकांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. आदेश मराठीत असता तर लोकांना व्यवस्थित समजला असता. त्यामुळे ९८ टक्के मराठी समजणाऱ्या लोकांना डावलून २ टक्के इंग्रजी समजणाऱ्या लोकांसाठी शिवसेना सरकार काम करत आहे का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.दरम्यान, राज्य सरकारने लॉकडाऊन बाबत नवीन नियमावली काल जाहीर केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेस संबोधित केलं. त्यावेळेस लोकमान्य टिळकांचा दाखला देत ‘पुनश्च हरी ओम’ अर्थात पुन्हा नव्याने सुरुवात करत असून, प्रत्येक पाऊल जपून टाकायचं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी तीन टप्प्यांमध्ये नियम शिथिल करण्यात येणार आहे. त्यामुळे, लॉकडाऊन ऐवजी आता मिशन बिगेन अगेन सुरु झालं असल्याचं त्यांनी म्हटलं.