… तर ट्रम्प कुटूंबानं शिवथाळीची ‘चव’ चाखली असती !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ट्रम्प सहकुटुंब अहमदाबाद आणि दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. अहमदाबाद त्यांनतर साबरमती आश्रम आणि केम छो मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासोबतच या दौऱ्यात भारतासोबतच्या व्यापार संबंधी करार करण्यात येणार असल्याचे समजते. मात्र त्यापूर्वी ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीवरुन टीका होत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, सध्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शिवथाळीची चर्चा आहे. संपूर्ण जगाला आश्चर्य वाटतंय, डोनाल्ड ट्रम्प मुंबईत आले असते तर त्यांनीही शिवथाळीची चव चाखली असती. राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्राची थाळी या कार्यक्रमाला ट्रम्प आणि त्यांची पत्नी येऊन रांगेत उभे राहून शिवथाळीचा अस्वाद घेतला असता असा टोला लगावला यावेळी संजय राऊत यांनी लगावला. यापूर्वीही मनसेने ट्रम्प यांना अहमदाबादेत का? असा सवाल उपस्थित केला होता.

शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून टाका करताना लिहिले गेले कि, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फक्त 36 तासांच्या हिंदुस्थान भेटीवर येत आहेत. त्यांच्या भेटीबद्दल देशभरात कमालीची उत्सुकता वगैरे शिगेला पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या तितक्याशा खऱ्या नाहीत. ट्रम्प हे अमेरिकेसारख्या स्वतःस महासत्ता वगैरे समजणाऱ्या एका देशाचे अध्यक्ष आहेत. ट्रम्प येतील आणि जातील 36 तासांनंतर त्यांच्या येण्या-जाण्याच्या खुणाही देशाच्या मातीत राहणार नाहीत. तसेच ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये सांगितले की, ‘‘मी हिंदुस्थान भेटीवर जात असून पंतप्रधान मोदी यांच्याशी व्यापारावर चर्चा करणार आहे.’’ म्हणजे ट्रम्प यांच्या भेटीचा मतलब साफ झाला आहे. त्यांना येथे व्यापार वाढवायचा आहे व त्यासाठी ते 36 तासांसाठी येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आल्याने येथील गोरगरीब, मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे यांच्या येण्याचे जनतेला कौतुक किंवा उत्सुकता असण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

दरम्यान, भारत दौरा करणारे ट्रम्प हे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता. मात्र, इतरांनी भारतासोबत पाकिस्तान किंवा शेजारच्या अन्य देशांनाही भेटी दिल्या होत्या. मात्र ट्रम्प फक्त भारताचा दौरा करणार आहेत. तसेच, इतर राष्ट्राध्यक्षांचे दौरे शासकीय व राजनैतिक पातळीवरचे होते. तर ट्रम्प यांच्या ३६ तासांच्या दौऱ्यात या अधिकृत कामांसाठी जेमतेम तीन तासांचा वेळ आहे. ट्रम्प प्रथमच भारतात येत असले तरी मोदी चार वेळा अमेरिकेला गेले आहेत.