…तर हॉस्पिटलमधील सेवा विस्कळीत होईल !

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश उद्योग आणि व्यावसायिक आस्थापने बंद असल्यामुळे राज्यातील विजेची मागणी कमी झाली आहे. विजेचा भार कमी झाल्याने महानिर्मितीला कोळशावर आधारित प्रकल्पातून 3 हजार 40 मेगावॉटचे उत्पादन घ्यावे लागत आहे.. दुसरीकडे राज्यातील सर्व रुग्णालयांत व्हेंटिलेटरसह इतर यंत्रासाठी योग्य दाबाने वीज देण्याचे आव्हान महावितरणपुढे आहे. त्यात सर्वानी अचानक दिवे बंद केले तर ग्रिड कोसळण्याचा व त्यातून महाराष्ट्रासह देशही अंधारात जाण्याचा धोका आहे. शिवाय रुग्णालयांसह इतर वैद्यकीय तपासणी व सेवा विस्कळीत होण्याचा धोका आहे. एकदा पॉवर ग्रिड बंद झाल्यास त्याला पुन्हा कार्यान्वित करायला 12 ते 16 तास लागतात. तर वीज स्थिती सामान्य व्हायला सुमारे आठवडा लागेल, असा इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार घरांतील विजेचे दिवे नऊ मिनिटे बंद करून मेणबत्ती किंवा पणत्या, बॅटरी लावाली लागणार आहे. मात्र, एकाच वेळी सगळ्यांनी दिवे व पंखे बंद केल्यास ग्रिडची फ्रीक्वेन्सी वाढून ते ठप्प होण्याचा व त्यातून देशातील वीजनिर्मिती केंद्रे बंद पडण्याचा धोका आहे. तसे झाल्यास मोठे नुकसान होईल. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी कित्येक तास लागतील. यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे जीवित धोक्यात येणार आहे. टाळेबंदीमुळे विजेच्या मागणीत घट झाल्याने ग्रिडमध्ये उच्चदाब असल्याने जर मागणीत पुन्हा घट झाली तर पॉवर ग्रिड कोसळू शकते. यामुळे करोनासह अजून नवीन वेगळे संकट उभे होईल. हा प्रकार म्हणजे एक एप्रिलऐवजी पंतप्रधानांनी 5 एप्रिलला देशाला एप्रिल फुल बनवण्यासारखे आहे. नागरिकांनी करोना रुग्णांसह इतरांच्या वीज यंत्रणेला धोका निर्माण होऊ नये म्हणून स्वतच्या घरचे दिवे, पंखे बंद करू नयेत, असे मत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.