‘तुम्ही नैतिकता शिकवू नका’, CM ठाकरेंचा भाजपवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने मेगाभरती करत इतर पक्षातील अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष फोडून अनेक दिग्गज नेत्यांना भाजपत घेतले. ज्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच नेत्यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला. याच मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये बोट ठेवले आहे. भाजपला टीका करू दे, त्यांनाच नैतिकता नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तरे देत विरोधकांवर निशाणा साधला. आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि राहणारच. काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. पण दोन्ही, तिन्ही पक्ष किंबहुना या देशात जेवढे पक्ष आहेत त्यांचे उदाहरण घ्या. आपापल्या राज्याचं हित, देशांच हित या विचारापेक्षा कोणी भिन्न आहे का? आम्हाला राज्याचे, देशाचे हित करायचे नाही का? राज्यात, देशात अराजक माजवायचंय का? अणि तरीही आम्ही तुमच्यासोबत येतोय असं म्हणून कोणी एकत्र आलेले नाही, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

पक्ष फोडून आणलेली माणसं चालतात
भाजपवर निशाणा साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पक्ष फोडून आणलेली माणसं तुम्हाला चालतात. मग त्या पक्षासोबतच हात मिळवला तर काय फरक पडतो? त्या पक्षातले मोठमोठे नेते घेऊन भाजपनंसुद्धा त्यांना सामावून घेतलेच आहे. कित्येक नेते काँग्रेसमधून त्यांनी घेतले. त्यांना आमदार, खासदार आणि इतर गोष्टी दिल्या आहेत. ते सुद्धा त्या विचारधारेवरच होते ना? असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला.

तुम्ही नैतिकता शिकवू नका
भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नैतिकतेच्या गोष्टी कोणी कोणाला शिकवायच्या, मोदींवर टीका करणारेसुद्धा त्यांना नंतर प्रिय होतात. त्यांच्या वॉर्डात जाऊन मोदी प्रचार करतात, ही नैतिकता ? बिहारमध्ये त्यांची आपापसात जुंपलीय, तरी ते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नैतिकता शिकवू नका. यांच्याकडून राज्याला आणि देशाला नैतिकता शिकण्याची गरज नही, असा आरोप त्यांनी भाजप नेत्यावर केला.