राज्यात फटाके बंदीबाबत अजूनही संभ्रम कायम ! खरेदीला मुभा, मात्र वाजविण्यावर बंधने

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महापालिका व जिल्हा प्रशासनाने फटाके फोडणेबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. परिणामी, दिवाळीच्या सणात थोड्याफार प्रमाणात का होईना पण आनंदात विरजण पडलं आहे. फटाके फोडण्याबाबत जारी केलेल्या सूचनांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रसिद्ध केलेल्या प्रदूषित शहरांच्या यादीतील महानगरांमध्ये फटाके फोडण्यास बंधने आहेत. मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी केवळ सोसायटीचे संघात खासगी परिसरांमध्ये किरकोळ स्वरूपाचे फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली. तसंच, राज्यातील शाळांमध्ये सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. या मार्गदर्शक सूचना जारी झाल्याने फटाके विक्रेत्यांच्या व्यवसायवर गदा आली आहे.

… काय आहेत हरित लवादाचे निर्देश
दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सर्व प्रकार फटाक्यांची विक्री व फटाके वाजविण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे. ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.

मुंबईत विक्रीचा गोंधळ
मुंबईत सध्या कोणते फटाके विकायचे, कोणते नाही याबाबत खूप गोंधळ आहे. विशेषकरून किरकोळ आणि होलसेल या विक्रेत्यांमध्ये गोंधळाची अवस्था निर्माण झाली आहे. असं असलं तरी मुंबईत सगळीकडे फटाके विकले जात आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी केवळ सोसायटीचे व शहरात, अंगण, खासगी परिसरांमध्ये हलकेफुलके स्वरूपाचे फटाके, फुलबाजी, अनार यासारखे फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली.

ठाण्यात स्टॉलला परवानगी नाकारली
ठाण्यासह कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये सुमारे ५५० स्टॉल आत्ता लागणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळं महापालिकेनं फटाके विक्री स्टॉलला परवानगी नाकारली आहे. ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी अडीचशेच्या आसपास विक्रीला परवानगी दिली जाते.

नवी मुंबईत विक्री बंद
नवी मुंबईत फटाके विक्री बंद आहे. नवी मुंबई महापालिकेनं नियमांचं पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या माध्यमातून या वर्षी शहरात फटाके विक्री स्टॉलला परवानगी देण्यात आलेली नाही.

नागपुरात फटाके फोडण्यास निर्बंध
नागपूर शहरात फटाके विक्रीला बंदी केलेली नाही. परंतु, महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास निर्बंध घातले आहेत. तसेच मोठ्या आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. महापालिका आयुक्तांनी आधी फटाके विक्रेत्यांना परवानगी दिली व आता फटाके फोडू नका असे आवाहन केलं आहे. चंद्रपूर महानगरपालिकेनं हवेची गुणवत्ता लक्षात घेतली. मध्यम श्रेणीतील पर्यावरणपूरक फटाके उडवण्यास मुभा दिली. फक्त पर्यावरणपूरक फटाके फोडण्याची परवानगी आहे.

औरंगाबादमध्ये अद्याप निर्णय नाही
फटाके विक्रीबाबत महापालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. शासनाकडून अधिकृतपणे फटाके उडविण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय आल्यानंतरच पाऊल उचलण्यात येईल, असे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडये यांचे म्हणणे आहे.

शहरात फटाक्यांची दुकाने सुरू झाली आहे. सध्या फटाके विक्री जोरात सुरू आहे. जवळपास ४४ व्यापाऱ्यांना हरकतीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत.लातूरमध्ये व्यापाऱ्यांचे नाहरकतसाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत.