…म्हणून इंदू मिलमधील पायाभरणी कार्यक्रम रद्द, CM ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बहुचर्चित इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. मात्र हा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आंबेडकर चळवळीतील नेत्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण न दिल्याने वाद निर्माण झाला होता. हा कार्यक्रम आज (शुक्रवार) दुपारी तीन वाजता होणार होता. अचानक हा कार्यक्रम रद्द झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच याप्रकरणी कुणीही राजकारण करु नये, असा टोलाही लगावला आहे.

मुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला केवळ 16 जाणांनाच निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबतच सामाजिक न्यायमंत्र धनंजय मुंडे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी हे उपस्थित राहणार होते. मात्र, बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील कोणालाही आमंत्रित न केल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढच नाही तर राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण दिले नाही.

इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. MMRDAनेही राज्य मंत्रिमंडलाच्या निर्णया नंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली होती. त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. मात्र, अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणं गरजेचं आहे. हे मी लक्षात आणून दिले. त्यामुळेच ठरवल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यंवरांना निमंत्रित करुन पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.