पंकजा मुंडेंची समर्थकांना महत्वाची सूचना !

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना पायबंद घातला आहे. त्याच अनुषंगाने वर्षानुवर्षे भगवानगडावर होत असलेला दसरा मेळावा यंदा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. यावर्षीचा दसरा मेळावा हा ऑनलाइन माध्यमातून होणार असल्याचे, पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही माहिती दिली.

पंकजा मुंडे यांनी समर्थक आणि भगवान भक्तांना सूचना करत सांगितलं की, ‘दरवर्षी प्रमाणे आपण दसरा मेळाव्याची वाट पाहत असतो. गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा सुरु केली असून, ती पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. मात्र, यंदा राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत मला तुम्हा सर्वांचे आरोग्य धोक्यात घालायचे नाही. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करणार आहोत. आपापल्या घरी, गावात भगवान बाबांच्या चरणी सर्वांना नतमस्तक व्हायचे आहे. भगवान बाबांचे पूजन करायचे आहे, मोठ्या संख्येने हा कार्यक्रम करायचा आहे,’ असे आवाहन त्यांनी या व्हिडिओत केलं आहे.

‘माझा मेळावा कसा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मी कालच मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. आपल्या दसऱ्याच्या मेळाव्याला प्रतिवर्षी लाखोंची गर्दी होत असते. सावरगाव येथे लाखो कार्यकर्ते भगवानगडावर जमा होत असतात, म्हणून हा निर्णय जाहीर करावा लागला असल्याचे मुंडे यांनी सांगितले. तद्वतच, मी स्वतः भगवानगडावर जात दर्शन घेणार आहे आणि तेथूनच फेसबुकच्या माध्यमातून लाइव्ह येऊन तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे,’ असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.