राज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जे नाराज आहेत ते शिवसैनिक नाहीत असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना पक्षातील नेत्यांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर राऊतांनी हे वक्तव्य केलं. याशिवाय, ते बाहेरून पक्षात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

पक्षात अनेक लोक नाराज आहेत. मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षात काही लोक नाराज आहेत यासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर राऊत म्हणाले, “पक्षात कोणी नाराज असणं या काही एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. अशा चिरकूट घटना होत असतात. जे नाराज आहेत ते शिवसैनिक नाहीत. तुम्ही ज्यांचं नाव घेत आहात ते आणि असे सर्व लोक मूळत: शिवसैनिक नाहीत. ते बाहेरून शिवसेनेत आले आहेत. त्यांना या सिस्टीममध्ये अ‍ॅड जस्ट व्हायला थोडा वेळ लागेल. त्यांपैकी सत्तार साहेब असू शकतात. परंतु आता जर ते आले आहेत तर पक्षानं त्यांना स्विकारलं आहे. अब्दुल सत्तार असे नेते आहेत जे काही बोलतात त्यावर ठाम असतात.” असंही राऊत म्हणाले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे किंवा नाही हे फक्त आणि फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच ठाऊक आहे. याबाबत काय ते मुख्यमंत्रीच सांगू शकतात. ते नाराज असतील तर का आहेत हे अद्याप समजलेलं नाही. सत्तारांनी जो राजीनामा दिला आहे तो आमच्याकडे येत नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयतून अशा प्रकारचं वृत्त आलेलं नाही की, सत्तारांनी राजीनामा दिला आहे” असंही ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/