‘स्कर्टवाली बाई’म्हणत भाजपा नेत्याची प्रियंका गांधींवर बोचरी टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘जी बाई आधी स्कर्ट घालून फिरायची ती आता साडी नेसून मंदिरात येते’ असे वादग्रस्त विधान करत भाजप नेते जयकारण गुप्ता यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. मेरठ येथील प्रचारसभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी प्रियंका गांधी यांच्या गंगा यात्रेवर टीका करताना हे वादग्रस्त विधान केले.

मोदींनी केलेल्या अच्छे दिनाच्या वक्तव्याबाबत विरोधी पक्षातील नेते अनेकदा टीका करत असतात. काँग्रेसही या वक्तव्यावरून भाजपवर निशाणा साधत असते. त्यालाच अनुसरून जयकारण गुप्ता यांनी नाव न घेता प्रियंका गांधींवर टीका केली आहे. गुप्ता म्हणाले की, “काँग्रेसचे नेते जोर जोरात ओरडतात, विचारत असतात अच्छे दिन आले का ? परंतु, त्यांना अच्छे दिन दिसत नाहीत. अरे स्कर्टवाली बाई आता साडी नेसून मंदिरात यायला लागली. देवासमोर माथा टेकवू लागली. गंगाजलाला नकार देणारे गंगाजलाचे आचमन करू लागले.” असे म्हणत त्यांनी प्रियंका गांधींवर बोचरी टीका केली.

प्रियंका गांधी यांच्यावरील या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र, यावर आक्षेप घेत जयकारण गुप्ता यांना ट्रोल करायला सुरुवात केली. त्यानंतर आपण कोणाचेही नाव न घेता हे वक्तव्य केले आहे असे म्हणत जयकारण गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिले आहे.