धक्कादायक ! डॉक्टरला मारहाण करत घरात डांबलं, मागितली 2 लाखांची खंडणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – उपचाराच्या बहाण्यानं बोलवून डॉक्टरला मारहाण करणाऱ्या आणि 2 लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. फैजान अली गफ्फार अली (वय 25), अहमद उर्फ गोलू रजा खान (वय 22) आणि अब्दुल खान (वय 24) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. हे तिघंही आरोपी हसनबागचे रहिवाशी आहेत. तिघांची एक दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. डॉ. अमोल विजय रुडे (वय 43 रा. व्यंकटेशनगर) यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अमोल रुडे हे आयुर्वेदीक डॉक्टर असून ते एका खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. हसनबागमधील जावेदच्या पानठेल्यावर अमोल नेहमी जातात. त्यांना 10 महिन्यांपूर्वी अहमद भेटला. त्यानं अमोल यांना सांगितलं की, मला यकृताचा त्रास आहे. उपचार करूनही त्रास कमी झाला नाही. काहीतरी आयुर्वेदीक उपचार करा.

यानंतर अमोल यांनी काही पथ्य पाळायला सांगत उपचार सुरू केले. परंतु त्यानं काही पथ्य पाळले नाही. 23 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास मोहीज नावाचा युवक त्यांच्या घरी आला अहमदची प्रकृती खालावली आहे असं सांगत त्यानं अमोल यांना सोबत येण्यासाठी सांगितलं. जबरदस्तीनंच त्यानं अमोल यांना अहमद याच्या हसनबाग येथील घरी नेलं. अहमदला ऑक्सिजन लावल्याचं अमोल यांना दिसलं. अमोल यांनी लगेचच अहमदला हॉस्पिटलला नेण्यास सांगितलं.

यानंतर तो अमोल यांना म्हणाला की, हॉस्पिटलचा खर्च कोण करणार. यानंतर तिघांनीही अमोल यांना मारहाण केली. त्यांच्याकडील मोपेडची चावी, मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावली. यानंतर त्यांना खोलीत डांबून ठेवत मारहाण केली. 2 लाखांची खंडणीही मागितली. पहाटे 2 वाजताच्या सुमारास त्यांनी अमोल यांना पैसे आणण्यासाठी सोडलं.

यानंतर अमोल घरी आले आणि त्यांनी भावाला घटनेची माहिती दिली. यानंतर अमोल व त्यांच्या भावानं नंदनवन पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी याची दखल घेत खंडणीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांदीपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तिघांना अटक केली. तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं तीनही आरोपींची एका दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.