फडणवीसांच्या उपस्थितीमधील सभेत 750 अधिक जण, हॉटेल मालकाला 3.5 लाखांचा दंड

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना मोठ्या संख्येने एकत्र जमण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. मात्र, अमरावती शहरातील एका पॉश हॉटेलच्या लॉनवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. त्या सभेस नियमांचे उल्लंघन करीत साडेसातशे लोकांनी गर्दी केली होती. या प्रकरणी संबंधित हॉटेल मालकांना आता साडेतीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

राज्य सरकारने लग्न समारंभाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. मात्र, तरीही शहरात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने नेते मंडळींचे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, शहरातील इतर मंगल कार्यालये, लॉन्स चालकांनासुद्धा इशारा देण्यात आला आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. नितीन धांडे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या हॉटेलाच्या लॉनवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नियमांचे उल्लंघन करत ७०० जणांनी तेथे सहभाग नोंदवल्याचे जिल्हा प्रशासनाचे मत आहे. प्रतिव्यक्ती ७५० रुपये याप्रमाणे तीन लाख ५० हजार रुपयांच्यावर दंड संबंधित लॉन चालकाला ठोठावला असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी म्हटलं. तसेच हा दंड वसूल करण्याची जबाबदारी महापालिकेकडे देण्यात आली आहे. शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आल्याने, इतर मंगल कार्यालयांना व सभागृह चालकांना हा इशाराच मानला जातो.

You might also like