भरधाव वाळूच्या ट्रकच्या धडकेने अपघात, आमदार रायमुलकरांसह तिघे जखमी

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यासह तिघे जण जखमी झाले. तिघांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात जानेफळ – मेहकर मार्गावर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडला होता.

मेहकर विधानसभेचे आमदार डॉ. संजय रायमुलकर हे आपल्या वाहनातून जानेफट येथून मेहकर येथे जात होते. यावेळी समोरुन वाळूचा ट्रक वेगाने आला. त्याने कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती. ट्रक हा रस्त्यावरच उलटा झाला तर रायमुलकर यांची गाडी रस्त्यालगतच्या नाल्यात पडून उलटी झाली.

डॉ. संजय रायमुलकर यांच्यासह चालक पंजाब गुडदे आणि अंगरक्ष ज्ञानेश्वर निकस हे तिघेही जखमी झाले आहेत. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिघांची प्रकृती सुधारत असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/