TikTok वर बंदी अन् चायनीज कंपनीला तब्बल 45 हजार कोटींचा फटका

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  गलवान खोऱ्यातील संघर्षावरून भारत-चीन यांच्यातील संबंध ताणले गेलेले असतानाच काही चिनी अँप देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं २९ जुलै रोजी ५९ चिनी अँप वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रसिद्ध टिकटॉक अँपचा देखील समावेश होता. मात्र, या बंदीनंतर बाईट डान्सला ४५ हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. चायनीज मीडिया ऑर्गनायझेशन ग्लोबल टाईम्सने यासंदर्भातले वृत्त दिलं आहे. यात सांगण्यात आलं की, Helo आणि Tiok tok सारख्या अँपवर बंदी घालण्यात आल्याने बाईट डान्सच्या उद्योगावर परिणाम झाला आहे.

टिकटॉकला चीनच्या बाहेर भारत हे सर्वात मोठे मार्केट होते. पण गेल्या आठवड्यात त्यावर बंदी घालण्यात आली. पब्लिकेशनने सांगितल्यानुसार, याचा थेट परिणाम चायनीज ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांवर पडला आहे. भारत सरकारच्या या निर्णयामुळे चीनच्या गुंतवणूकदार आणि उद्योगपतींना मोठा झटका बसला आहे. बाईट डान्सला अँपवर जाहिरात दाखवण्यासाठी जो पैसा मिळत होता तो आता या बंदीनंतर मिळणे बंद झाला. कंपनीचे हे अँप खासकरुन भारतात खूप प्रसिद्ध होते. भारताच्या थेट ग्रामीण भागापर्यंत हे अँप पोहचले होते. टिकटॉक भारतात ६६ कोटी वेळा डाउनलोड करण्यात आले होते. पण सध्या टिकटॉकला प्ले स्टोर आणि अँप स्टोरवरून काढण्यात आलं आहे.

डेटा सिक्योरिटी बनले कारण

भारत सरकारने ५९ चायनीज अँपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. देशातील नागरिकांची डेटा सिक्योरिटी धोका निर्माण झाली असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. भारत चीन सीमेवर तणाव वाढल्याने चायनीज उत्पादनावर बंदी घालण्याची मोहीम सोशल मीडियावरती जोरात सुरु होती. देशभरात चीन विरुद्ध वातावरण निर्माण झाल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.