पोलीस कोठडीत पिता-पुत्राचा मृत्यू, न्यायदंडाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची माजी न्यायमूर्तींची मागणी

तुतीकोरीन/तामिळनाडू : वृत्तसंस्था – पोलीस कोठडीत पिता-पुत्राचा मृत्यू प्रकरणात साथानकुलमचे न्याय दंडाधिकारी बी. सर्वानन यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणी के. चंद्रू यांनी केली आहे. ते मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. ही घटना तामिळनाडूमधील तुतीकोरीन जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणात न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायिक अनुचित व्यवहार, अटक करण्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शकतत्वांचे उल्लंघन आणि गैरवर्तन स्पष्टपणे दिसत आहे, त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे असे के. चंद्रू यांनी म्हटले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आणि न्याय दंडाधिकाऱ्यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाने अटकेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, असे के. चंद्रू यांनी म्हटले आहे. आरोपींना हजर केले, त्यावेळी त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही असे सांगून साथानकुलमचे न्याय दंडाधिकारी स्वत:चे हात झटकू शकत नाही असे के. चंद्रू यांनी म्हटले आहे.

ते जर जखमी अवस्थेत होते, रक्तस्त्राव सुरु होता त्यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्या दुखापतीची चौकशी करायला हवी होती. पिता-पूत्र दोघांमध्येही त्राण नसतील ते लंगडत चालत असतील तर न्याय दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना जाब विचारणे आवश्यक होते. ते न्याय दंडाधिकाऱ्याचे काम आहे. साथानकुलमच्या न्याय दंडाधिकाऱ्याने कायदा आणि देशाच्या संविधानाचे पालन केले नाही, त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी के. चंद्रू यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण
तामिळनाडूतील तुतीकोरीन जिल्ह्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला. याप्रकरमात पोलिसांवर अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. तामिळनाडूमध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच या घटनेचा निषेध केला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार या दोघांना पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पी. जयराज (वय -59) आणि जे बेनिक्स अशी या दोघांची नावे आहेत. 19 जून रोजी लॉकडाऊन दरम्यान मोबाइलचं दुकान सुरु ठेवलं म्हणून चौकशीसाठी त्यांना साथाकुलम पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. कोठडीत पोलिसांनी जबर मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.