‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ ! पुण्यात पाणी न आल्याने रस्ता रोको

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या दरिद्री कारभारामुळे ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ या म्हणीचा प्रत्यय पुणेकरांना शुक्रवारी सकाळी आला आहे. गुरुवारी कामानिमित्त संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर आज सकाळी शहराच्या अनेक भागात पाणी न आल्याने नागरिकांचा उद्रेक होऊन पर्वती भागात लोकांनी रस्त्यावर येत रास्ता रोको आंदोलन केले आहे.

यंंदा पाऊस धो धो कोसळल्यानंतर खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे भरुन वाहत आहेत. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने शहरात या पावसाळ्यात किमान दोनदा पूर आले असले तरी पिण्यासाठी किमान पाणी मिळावे, ही अपेक्षाही भर पावसाळ्यात पुणे महापालिकेच्या दळभद्री कारभारामुळे पूर्ण होऊ शकत नाही.

पुणे महापालिकेने गुरुवारी कामाचे निमित्त सांगून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्यानंतर शुक्रवारी पाणी येणे अपेक्षित होते. मात्र, आज सकाळी अनेक ठिकाणी पाणीच आले नाही. पर्वती शिवदर्शन भागात पहाटे पाणी येते. पाणी भरुन कामाला जाण्याच्या तयारीत नागरिक असताना सकाळी ७ वाजून गेले तरी पाणी न आल्याने नागरिक संतप्त झाले. ते कळशा, भांडी घेत रस्त्यावर उतरले व त्यांनी शिवदर्शन येथील चौकात रस्ता अडवून धरला होता. या घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Visit – policenama.com