सरपंचाची निवडणूक लढतेय मुळची पाकिस्तानी असलेली नीता, 5 महिन्यांपुर्वी मिळालीय भारतीय नागरिकता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पहिल्यांदा पाकिस्तानातून शिक्षण घेण्यासाठी भारतात आल्या, त्यानंतर आठ वर्षांपूर्वी येथीलच एका प्रतिष्ठित कुटूंबाची सून झाल्या आणि पाच महिन्यांपूर्वी या पाकिस्तानी तरुणीला भारतीय नागरिकत्व मिळाले. आता विशेष म्हणजे भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर मूळ पाकिस्तानी असलेल्या भारतीय सुनेने सरपंच पदाची निवडणूक लढण्याचा विचार केला आहे. या आहेत नीता कंवर, ज्या राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील नटवाडा ग्राम पंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत. भारतीय पेहरावात घुंघट घालून त्या स्वत: प्रचारासाठी उतरल्या आहेत.

या प्रचारादरम्यान नटवाडा गावात रस्त्यावर लांब घुंघट परिधान करुन नीता सरपंच पदासाठी मत मागण्यासाठी जात आहेत. नीता 8 वर्षांपूर्वी येथील माजी ठिकाणेदार आणि तीन वेळा सरपंच असलेले लक्ष्मण करण यांचे पुत्र पुण्य प्रताप करण यांच्याशी विवाहबंध होऊन या गावात आल्या.नीता पाकिस्तानी नागरिक असल्याने पाच महिन्यापूर्वी त्या पाकिस्तानी सून म्हणून ओळखल्या जात होत्या.

पाच महिन्यापूर्वी सप्टेंबर 2019 मध्ये नीता यांना बऱ्याच काळाच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर भारतीय नागरिकत्व मिळाले. भारतीय नागरिकत्व मिळाल्याने आणि यंदाचे नटवाडा ग्राम पंचायतीचे सरपंच पद महिलांना आरक्षित झाल्याने नीता निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. निवडणूकीच्या मैदानात उतरण्यामागचे कारण नीता यांनी ग्रमास्थांचे प्रेम आणि सासरे लक्ष्मण करण यांची प्रेरणा सांगितले आहे. नीता कंवर जेथे प्रचारासाठी जातात तेथे ग्रामस्थांना चांगले आरोग्य आणि शिक्षण देणे ही आपली प्राथमिकता असल्याचे सांगतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/