पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीचा 24 तासांत लावला छडा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मांजरसुंबा गडावर पर्यटकांना लुटणार्‍या चौघांच्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने आज दुपारी अटक केला आहे. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीच्या म्हाेरक्यानो मांजरसुबा गडावर आतापर्यंत 6 गुन्हे केल्याचा उलगडा झाला आहे.

याप्रकरणी रामा रणजित निकम (वय 30), आकाश भानुदास हानवत (वय 20, दोघे रा. कात्रड, ता. राहुरी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार अरविंद भानुदास हानवत व संतोष बर्डे हे दोघे फरार आहेत.

मांजरसुबा गडावर गेलेल्या पर्यटकांची अनेक दिवसांपासून लुटमार सुरू होती. सोमवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांना लुटल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 24 तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीचा छडा लावला. टोळीतील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. इतर दोघे फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी चोरलेला मोबाईल हँडसेट व एक हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

यातील मुख्य आरोपी रामा निकम याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात यापूर्वी पाच गुन्हे दाखल आहेत. मांजरसुंभा गडावर देवदर्शन व पर्यटनासाठी गेलेल्या जोडप्यांना ही टोळी लुटत होती. विशाल बाळू औटी (रा. पारनेर) यांना लुटल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन दोघांना अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक दिलीप पवार त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन खामगळ, पोलिस कर्मचारी सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, विष्णू घोडेचोर, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, दीपक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, शंकर चौधरी, रोहिदास नवगिरे, बाळासाहेब भोपळे आदींच्या पथकाने केली आहे. आरोपींना पुढील चौकशीसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत.