तब्बल सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या लढ्यासाठी राज्य सरकार सज्ज असून त्यासाठी सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे दीड हजार व्हेंटिलेटर, अडीच लाख एन 95 मास्क उपलब्ध असल्याची माहिती टोपे यांनी दिली. राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.

नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत सोशल डिस्टंन्सिग राखावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी. राज्यात आरोग्य पथकांमार्फत क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेतून सर्वेक्षणाबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 9 लाख लोकांचे ट्रेसिंग करण्यात आले आहे. याकामासाठी येणार्‍या आरोग्य कर्मचर्‍यांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आवश्यकता भासल्यास राज्यात आरोग्य सेवेसाठी पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ असावे यासाठी राज्यातील आर्युवेदीक, युनानी, होमिओपॅथी या आयुष डॉक्टरांची सेवा घेता यावी याकरिता त्यांना आठवडाभरात कोरोनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आजच आयुषच्या 250 मुख्य प्रशिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.