भरधाव ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू, दोनजण गंभीर जखमी

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन यामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (दि.२९) रात्री मंगळवेढा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दामाजी महाविद्यालयासमोर घडला.

राहुल शिवाजी कसगावडे (वय १८) असे या तरुणाचे नाव आहे. तर अमोल लक्ष्मण शिंदे (वय १८) व अशोक सीताराम सावंजी (वय १८) हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालट्रक (एम. एच. 13 सी एक्स 1670) सोलापूरच्या दिशेने जात होता. हा मालट्रक महाविद्यालयाजवळ आला असताना दुचाकीवर मंगळवेढाकडे येत असलेल्या राहुल कसगावडे व अशोक सावंजी यांना ट्रकचालकाने समोरून धडक दिली. समोरुनच जोरदार धडक दिल्याने ट्रकमध्ये दुचाकी अडकली आणि ४०० मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. तसेच पायी चालत येणाऱ्या अमोल शिंदे याला देखील ट्रकने जोराची धडक दिली.

या अपघातात राहुल कसगावडे जागीच ठार झाला तर जखमी सावंजी व शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक चालकाविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.