‘कोरोना’वर मात केल्यानंतर तुकाराम मुंढे यांची भावनिक पोस्ट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीचा आदेश आला. घरीच असल्याने मनात विचारांचे काहूर सुरु झाले. मात्र, कोणत्याही नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक दृष्टीकोन ठेवला. कारण कोरोनाच्या पॉझिटिव्ह चाचणीवर मात करायची असेल तर विचारांची सकारात्मकता आवश्यक होती. ही सकारात्मक, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या शुभेच्छांच्या जोरावर आज कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य झाल्याची भावनिक पोस्ट नागपूरचे माजी आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केली आहे.

तुकाराम मुंढे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून आपण कोरोना मुक्त झाल्याचे सांगितले आहे. प्रबळ इच्छाशक्ती, शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी आज कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नागपूर महापालिकेच्या सात महिन्यांच्या आयुक्त पदाच्या कार्यकाळातील साडे पाच महिने कोरोना महामारिविरुद्ध यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करण्याचा योग आला. यादरम्यान सर्व प्रोटोकॉल पाळले. मात्र कर्तव्य बजावताना मलाही कोरोनाची लागण झाली. 24 ऑगस्ट रोजी चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता, असे त्यांनी सांगितले आहे.

समजातील दुष्प्रवृत्ती आणि कुविचारांवर मात करण्यासाठीसुद्धा प्रत्येकाने आपली दांडगी इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि ध्येयनिश्चितीच्या जोरावर समाजात सकारात्मकता पसरवावी अशा सदिच्छा व्यक्त करत, चला समाजाला सकारात्मकता रुजविण्यासाठी समविचारी आणि प्रबळ इच्छाशक्ती बाळगणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊया असे आवाहन त्यांनी पोस्टच्या माध्यमातून केलं आहे.