Kamshet : कामशेत परिसरात मेफेड्रोन ड्रग्सची विक्री आलेल्या दोघांना अटक, 67.37 ग्रॅम मेफेड्रोन जप्त

कामशेत/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – मावळ तालुक्यातील कामशेत परिसरात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 67.37 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण 6 लाख 68 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाजी मारुती कडू (वय-32, रा. कुरवंडे, ता.मावळ), सोमनाथ वसंत बालगुडे (वय-30, रा.पाथरगाव ता.मावळ) अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा ते वडगाव मावळ जुन्या महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना खामशेत हद्दीत दर्शन मिसळ हाऊस समोर कामशेतच्या दिशेने तोंड करून एक राखाडी रंगाची मारुती ब्रिझा (एमएच 14 जीएच 1992) उभी होती. तसेच त्याच्या समोर एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर (एमएच 14 ईजी 9318) एक व्यक्ती संशयास्पद उभे होते. त्यांच्या हालचालीचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही.

पोलिसांनी सोमनाथ बालगुडे याची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टच्या डाव्या खिशात एक प्लॅस्टिक पिशवी आढळून आली.त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर असलेल्या 15 पुड्या सापडल्या. तसेच पॅन्टच्या खिशात मोबाइल आणि रोख रक्कम मिळाली. याबाबत विचारणा केली असता त्याने या पुड्या शिवाजी कडू याच्याकडून घेतल्याचे सांगितले. शिवजी कडू याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक मोबाइल व पॅन्टच्या खिशात एक लहान इलेक्ट्रॉनीक्स वजन काटा सापडला. तसेच त्याच्या करामध्ये 52 ग्रॅम 20 मिली ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले.

पोलिसांनी दोघांकडून 1 लाख 34 हजार 740 रुपये किंमतीचे 67.37 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. तसेच 5 लाख 33 हजार 360 रुपयाची कार, दुचाकी, वजन काटा मोबाइल रोख रक्कम असा एकूण 6 लाख 68 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, कामशेत पोली ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, दत्तात्रय जगताप, शब्बीर पठाण, विद्याधर निचित, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, सुनील जावळे, सुनील वाणी, सचिन गायकवाड, पोलीस नाईक सागर चंद्रशेखर, गुरू जाधव, पोलीस शिपाई अक्षय जावळे, बाळासाहेब खडके यांच्या पथकाने केली.