भोपाळमधील बनावट नोटांचं जळगाव कनेक्शन ; दोघांना अटक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भोपाळमधील एका ढाब्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ४७ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. याप्रकरणी जळगावचे कनेक्शन पुढे आले असून भोपाळ पोलिसांनी शहरातून दोघांना अटक केली आहे. सद्दाम कुरेशी (रा. भोपाळ) आणि भूपेंद्र पाटील (रा. पाचोरा) अशी अटक केलेल्या या दोघांची नावे आहेत.

भोपाळ येथील साक्षी ढाब्यावर पोलिसांनी काही दिवसापूर्वी छापा मारला होता. यात त्यांना ४७ हजार रूपयांची रोकड मिळून आली होती. ती रक्कम बनावट असल्याचे समोर आले.

बनावट रोकडसोबत असलेला संशयित सद्दाम कुरेशी हा पिंप्राळा-हुडको या भागात असल्याची माहिती भोपाळ पोलिसांना मिळाली. त्यांनी शुक्रवारी जळगाव गाठत स्थानिक पोलिसांच्या मदतीने सद्दाम कुरेशी यास अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे १ लाख ४० हजार रूपयांची बनावट रक्कम आढळून आली. यानंतर पोलिसांनी कुरेशी याच्याकडे चौकशी केली. त्यात त्याने त्याचा साथीदार भूपेंद्र पाटील याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्याला जळगावात बोलावयास सांगितले. पाटील जळगावात आल्यावर त्यालाही अटक करण्यात आली.

नोटाबंदीनंतर बनावट नोटा सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. आता या बनावट नोटांमधील टोळीचा शोध घेण्यात येत असून त्यांनी या नोटा कोठे छापल्या. की अन्य ठिकाणाहून त्या त्यांच्यापर्यंत पोहचल्या. याचा तपास भोपाळ पोलीस करीत आहेत.