भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा ‘महाविकास’वर निशाणा, म्हणाले – ‘राज्यात दोन मुख्यमंत्री एक मातोश्रीवर आणि दुसरे…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडूनच दाखवा, असे थेट आव्हानच त्यांनी भाजपला दिलं. त्यांच्या या आव्हानानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुम्ही इतर वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन दाखवा, असा पलटवार केला आहे. तसेच राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.
चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून सडकून टीका केली. चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. त्यामुळे मॅच फिक्सिंग हे इथे आलेच आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आहेत. मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतिपाठक आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचे नाव न घेता सणसणीत टोला लगावला. चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात सध्या दोन मुख्यमंत्री आहेत. एक जे ‘मातोश्री’ वर बसून काम करत आहे. आणि दुसरे हे राज्यभर फिरत आहेत, असं म्हणत त्यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

राजकीय परिस्थितीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सातवीच्या मुलाला सध्याच्या राजकीय स्थितीवर निबंध लिहीण्यास सांगितले तरी ते लिहितील. सरकार जाणार नाही हे कार्यकर्त्यांना निश्वास देण्यासाठीच वक्तव्य उद्धव ठाकरे करत आहेत. मुळात तिघे ही भांडतात, मग परत काहीच झाल नाही असं सांगतात, अशी टीका त्यांनी केली. तसेच अधिकाऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंत बदल्या करताना विश्वास देण्यासाठी सरकार जाणार नाही हे सांगत आहेत. पण कोंबड झाकून ठेवलं तरी सुर्य उगवायचा राहत नाही. मुख्यमंत्र्यांनी कद्रूपणा सोडावा विरोधी पक्षाच्या आमदारांशी बोलावं आणि पुण्याची चिंता करावी, असंही पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, अजित पवार अपयशी ठरत आहेत. हे दाखवायचे प्रयत्न सध्या महाविकास आघाडीमध्ये सुरु आहे. आता हे कोण करत आहे हे तुम्ही पहा, असं म्हणत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट केलं.