मुंबई : फोर्ट इमारत दुर्घटनेत 2 ठार आणि 4 जखमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील फोर्ट भागातील जीपीओ पोस्ट ऑफिस समोरील पाच मजली भानुशाली बिल्डिंगची एक बाजू कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यु ऑपरेशन सुरु आहे. ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली.


घटनेनंतर खासदार अरविंद सावंत या ठिकाणी दाखल झाले. पोलीस आयुक्त आणि इतर मंडळीही घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी आले. त्यांनी या ठिकाणी नेमकं काय घडलं याची माहिती घेतली. पोलीस आयुक्तांशी त्यांनी चर्चा केली. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. एनडीआरएफ देखील घटनास्थळी दाखल झाले आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जणांवर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. भानुशाली बिल्डींग मालकाचं नाव मोटी भाडीया असं आहे. ही इमारत धोकादायक होती, तिला नोटीसही बजावण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत ही रहिवाशी आणि व्यावसायिक आहे. दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत 20 जण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि बीएमसीचे आयुक्त इकबालसिंह चहल घटनास्थळी पोहचले.

महापालीका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते त्यांनी भानुशाली इमारत दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, क्रेनच्या सहाय्याने आतापर्यंत 12 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. ढिगाऱ्याखालून सहा जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी चारजण जखमी आहेत. तर दोघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.