मद्य पिऊन वाहन चालवणे पडले महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मद्य पिऊन दुचाकी चालविल्या प्रकरणी मोटार वाहन न्यायालयाने एकाला दोषी ठरवीत दोन हजार रुपये दंड ठोठावला. आरोपीची कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला फक्त दंडाची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात किराड चौक येथे हा प्रकार घडला होता. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली होती. दि. १४ डिसेंबर २०१८ रोजी रात्री १०:३०च्या सुमारास किराड चौक येथे बंडगार्डन वाहतूक पोलीस विभागाचे पोलिस मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई करीत होते. यावेळी सुनील कराडकर हा दुचाकी स्वर तिथे येत होता.

आरोपी हा वेडीवाकड्या पद्धतीने दुचाकी चालवत असल्याने पोलिसांनी त्याला थांबविले. ब्रिथ ऍनालायझर या उपकरणाद्वारे त्याची तपासणी केली असता त्यांनी मद्य प्राशन केल्याचे सिद्ध झाल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी खटल्यात सरकारी वकील अनंत चौधरी यांनी बाजू मांडली. ब्रिथ एनालायझर रिपोर्ट आणि वैद्यकीय चाचणी अहवाल आदी पुराव्यांच्या आधारे आरोपीला शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती. आरोपीच्या वकिलांनी ही ब्रीथ ऍनालायझर चाचणी आणि वैद्यकीय चाचणी ही योग्य पद्धतीने झाली नाही असा युक्तिवाद केला. परंतु हा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला.

सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा न्यायालयाने ग्राह्य मानत आरोपीला दोषी ठरविले. यानंतर आरोपीच्या वकिलांनी आरोपीवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असून त्याच्या वयाचा आणि कुटुंबियांचा विचार करावा, त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी मागणी केली. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार मध्य पिऊन वाहन चालवणाऱ्यास सहा महिने कारावास आणि आर्थिक दंड ठोठावण्याची तरतूद आहे. या तरतुदीपैकी न्यायालयाने आर्थिक दंड आरोपीला सुनावला.