उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजेंच्या गळाभेटीने सातारा जिल्ह्यात मनोमिलनाचे पर्व

सातारा : पोलीसानामा ऑनलाईन – सातारा जावळी मतदार संघातील कार्यकर्ता मेळाव्यात उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजेंची गळाभेट झाली. यामुळे सातारा जिल्ह्यात पुन्हा मनोमिलनाचे पर्व सुरु झाल्याचे दिसून येत आहे. व्यासपीठावर दोन्ही राजेंनी इथून पुढच्या काळात मनोमिलन कायम करण्याच्या आणाभाका घेतल्या.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष माधवी कदम, सभापती मिलिंद कदम, वनिता गोरे, उपसभापती जितेंद्र सावंत, युवक अध्यक्ष तेजस शिंदे, ऋषिकांत शिंदे आदी उपस्थित होते.

मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार जयंत पाटील म्हणाले, देशातील जनता फसवणुकीला कंटाळली आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांची लबाडी मतदारांनी अनुभवली आहे. अशा खोटारड्या आणि जुमलेखोरांना कायमस्वरुपी हद्दपार करा. सातारकर कायम राजघराण्याच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत यावेळी देखील हेच होईल. साताऱ्यात दोन्ही राजेंच्या मनोमिलनामुळे कार्य़कर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. हे चैतन्य कायमस्वरुपी टिकवून ठेवण्याची जबाबदारी दोन्ही राजेंची आहे, असेही आमदार जयंत पाटील म्हणाले.

खासदार उदयनराजे म्हणाले, साताऱ्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या विरोधकांनी आमच्यावर दहशत करत असल्याचा आक्षेप घेतला आहे. माझी दहशत प्रेमाची आणि आदराची आहे, हे त्यांच्या सारख्यांना समजणार नाही.

उदयनराजे आणि मी निवडणुकीमुळे एकत्र आलेलो नाही, ऐतिहासिक सातारा जिल्ह्याच्या भल्यासाठी एकत्र आलो आहे. आपापसातील संघर्ष आम्ही नक्की सोडवू, गैरसमज पसरवणाऱ्यांचा आम्ही दोघेही बंदोबस्त करु, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले दिला.