राष्ट्रवादीचा राजीनामा देणार्‍या ‘या’ आमदारासाठी उद्धव ठाकरे यांनी पाठवलं ‘खास’ विमान

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला असून बागडे यांनी तो मंजूर देखील केला आहे. त्यानंतर आता ते मुंबईला रवाना होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन बांधणार आहेत.

मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे भास्कर जाधव यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खास विमानाची व्यवस्था केली होती. राजीनामा फॅक्सने पाठवून देखील तो मंजूर करून घेता आला असता, मात्र त्यात वेळ गेला असता. त्यामुळे जाण्यासाठी उद्धव साहेबांनी खास विमानाची सोय केल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या तत्पर पक्षप्रमुखाचे देखील यातून दर्शन घडून आले. त्यामुळे आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत असताना शिवसेना देखील विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता विधानपरिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आधीच मोठ्याप्रमाणात गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस हि गळती रोखण्याचे काही प्रयत्न करणार कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, जाधव यांच्याबरोबर अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांचा हा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी खोडून काढल्याने आज नक्की काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –